Shashank
चित्रपट बघितल्यानंतर तो प्रेक्षकांना विचार करण्यास लावतो आहे की नाही यावरुन चित्रपटाच्या दर्जाचा अंदाज येतो. असाच एक दर्जेदार चित्रपट बघितला - स्लमडॉग मिलिअनेर. एक साधा चहावाला पोर्‍या (जमाल) हु वॉन्ट्स टु बी अ मिलिअनेर या कार्यक्रमात एक मिलीयन जिंकतो, आणि फसवणुकीच्या संशयावरुन त्याला पोलीसात दिले जाते. या कार्यक्रमात जिंकण्याएवढी माहीती तुला मिळाली कशी ? या प्रश्नाचे उत्तर जमाल देत असतो आणि त्याबरोबर त्याचे आयुष्य उलगडत जाते. जमाल आणि सलीम रहात असतात मुंबईतील एका झोपडपट्टीत. तिथेच त्याची लतिकाशी ओळख होते. एका दंगलीमधे त्यांची वाताहत झाल्यानंतर ते एका गँगच्या हाती लागतात. मुलांचे डोळे फोडुन त्यांना भिक मागायला लावणारे हे लोक आहेत असे त्यांच्या लक्षात आल्यावर सलीम व जमाल तेथुन पळ काढतात परंतु लतिका त्या गँगच्या तावडीत सापडते. इथुन पुढे, सलीमचा गुन्हेगारी जगताकडे प्रवास होतो. जमाल लतिकाला विसरु शकत नाही व तो तिला पुन्हा शोधुन काढतो. इथेच दोघा भावांमधे दरी पडते. सलीम पिस्तुलाच्या बळावर लतिकाचा गैरफायदा घेतो. मधे पुन्हा काही बर्ष गेल्यानंतर जमाल लतिकाला शोध घेतो पण लतिका आता जावेद नावाच्या मोठ्या गुंडाकडे असते. लतिका तिथुन सुटका होते का. जमालचे निरपराधित्व सिद्ध होते का ? आणि पुन्हा हु वॉन्ट्स टु बी अ मिलिअनेर च्या सेटवर येउन तो संपुर्ण जिंकतो का हे चित्रपटातच पाहणे उचित ठरेल.

चित्रपटात भारतातील गुन्हेगारी, झोपडपट्टीतले जीवन, गरीबी, दंगल या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. चित्रपटातील पहील्या काही मिनीटातील दृष्यात, जमाल व सलीम मागे लागलेल्या हवालदारापासुन वाचण्यासाठी पळतात, तेंव्हा कॅमेरा त्यांच्या पाठीमागे पळवुन झोपडपट्टीचे दर्शन घडवले आहे. तसेच लहान मुलांचे डोळे फोडणारे दृष्य अंगावर काटा आणते. जमाल परदेशी पर्यटकांना स्थळे दाखवत असताना, त्यांच्या गाडीचे टायरसकट काही भाग चोरीला जातात, तेंव्हा जमालच्या तोंडी एक वाक्य आहे, इफ यु वाँट टु सी द रियल इंडिया, धिस इज रियल इंडिया.

चित्रपटात काही चुका आहेत. उदा. चित्रपटात कधी हिंदीत संवाद आहेत तर कधी इंग्लीश. जमालच्या इंग्लीशचे अक्सेंट भारतातले नक्कीच वाटत नाही. सलीम पिस्तुल कोठुन मिळवतो ते दाखवलेले नाही. तसेच त्यासंबंधी एक प्रश्न जमालला विचारला जातो त्याचे उत्तर जमाल बरोबर देउ शकतो हे पटत नाही. त्याच प्रमाणे मुंबईतल्या झोपडपट्टीतील शाळा इंग्लीश मिडीयमची असु शकते का हा प्रश्न पडतो.

असे असले तरी चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट आहे. चित्रपटाला चार गोल्ड्न ग्लोब ऍवार्डस मिळाले आहेत. त्यात उत्कॄष्ट संगीत चे ऍवार्ड आपल्या ए.आर. रेहमानला मिळाले याचा प्रत्येक भारतीयाला आनंद होईलच. चित्रपटात जो भारत दाखवलेला आहे तोच आणि तेवढाच फक्त 'रियल इंडिया' नाही, हे पाश्चात्यांना कळले आहे की नाही हे मला माहीत नाही. परंतु, प्रगतीची स्वप्ने पाहताना, यात दाखवलेला रियल इंडिया अस्तित्वात आहे याचा विचार हा चित्रपट करायला लावतो यात शंका नाही.